पुणे : कोकणात जमीन खरेदीच्या आमिषाने लष्करी अधिकाऱ्याची ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सोमवारी (दि. २) उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्करातील एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लेफ्टनंट कर्नल प्रताप रजनीश सिंग (वय ४९, रा. श्रीनिवास क्रॉस काउंटी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, लेफ्टनंट कर्नल डी. एस. पाटील (वय ५८, रा. चऱ्होली ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग हे सध्या ओरिसामध्ये नियुक्तीस आहेत. ते २०१५ ते २०१८ या कालावधीत खडकीतील बॉम्बे सॅपर्समध्ये नियुक्तीस होते. त्यावेळी त्यांची ओळख लेफ्टनंट कर्नल डी. एस. पाटील यांच्याशी झाली.
पाटील यांनी त्यांना कोकणात जमीन खरेदी करून देतो, असे सांगितले होते. त्यासाठी सिंग यांनी पाटील यांच्या बँक खात्यात ३७ लाख रुपये जमा केले. मात्र, पाटील यांनी जमीन खरेदी करून दिली नाही. सिंग यांनी त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा पैसे परत देण्यास त्यांनी टाळाटाळ केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस पुढील तपास करित आहेत.