मुळशी : विसाघर (ता. मुळशी) येथे बांधकाम सुरू असलेल्या संरक्षक भिंतीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंगासागर शैलेंद्र राम (वय-३१, सध्या रा. लोणावळा, ता. मावळ; मूळगाव मौधिया, जि. गाजीपूर, उत्तर प्रदेश), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत अतीउर रेहमान ईशय खबीराज (वय-३४, रा. ॲम्बे व्हॅली, विसाघर) यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना सोमवारी २० मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबीराज यांचा गवंडीकामाचा व्यवसाय आहे. गंगासागर हा पूर्वी त्यांच्याकडे कामाला होता. सकाळी ८ वाजता विसाघर येथील बंगल्याच्या बांधकामाचे ठिकाणी असलेल्या संरक्षण भिंतीवरून एक व्यक्ती खाली पडून जखमी अवस्थेत आढळला.
जवळ जाऊन पाहिले असता तो गंगासागर असल्याचे लक्षात आले. तो बेशुद्ध होता. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला होता. त्याला तातडीने सहारा सिटी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचा मृत्यू झाला होता. याबाबतचा पुढील तपास पौड पोलिस करीत आहेत.