पिंपरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील मीटर निरीक्षक विकास सोमा गव्हाणे यांना महापालिका सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. विकास गव्हाणे हे महापालिकेच्या सांगवी विभागीय कार्यालयात मीटर निरीक्षक या क गटातील पदावर कार्यरत होते. पाणीपट्टी बील कमी करण्यासाठी १६०० रुपयांची लाचेची मागणी करून मानधन तत्वावरील संगणक महिला ऑपरेटरमार्फत स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध भोसरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी लोकसेवक गव्हाणे हे सुट्टीवर असून परराज्यात गेल्याने त्यांना अटक झाली नसल्याचे भोसरी पोलिसांनी महापालिका कार्यालयास कळविले आहे. विकास गव्हाणे यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून केलेले गुन्हेगारी कृत्य पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रतिमेस अशोभनीय आहे. या कृत्यामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलीन होऊन महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम एक, दोन तीनमधील तरतुदींचा भंग केला आहे. त्यामुळे गव्हाणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्यांना महापालिका सेवेतून निलंबित करत, विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.