पोपट पाचंगे / कारेगाव : रांजणगाव एमआयडीसीमधील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड (एमईपीएल) कंपनी कायमस्वरुपी बंद व्हावी यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर दोन दिवस धरणे आंदोलन केले. या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे निमगाव भोगी व परिसरातील शेती क्षेत्र पूर्णतः नापीक झाली असून, यामुळे असंख्य जनावरे देखील दगावली आहेत.
गुरुवारी (दि. १०) सकाळी टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करुन आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (दि. ११) या धरणे आंदोलनाला कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर भजनाने सुरुवात झाली. या आंदोलनात सरदवाडी व निमगाव भोगी येथील भजनी मंडळ सहभागी झाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर, राहुल पाचर्णे, शशिकांत दसगुडे, आबासाहेब सरोदे, निमगाव भोगीच्या सरपंच उज्ज्वला इचके, उपसरपंच विकास रासकर, माजी सरपंच सचिन सांबारे, अंकुश इचके, संजय पावशे, उत्तम व्यवहारे, लक्ष्मण सांबारे, गणेश कर्डीले, प्रकाश थोरात, नितीन थोरात, संतोष कर्डीले, आबासाहेब जाधव, संतोष शिंदे, संतोष झंजाड आदिसह निमगाव भोगी, सरदवाडी, कर्डेलवाडी, अण्णापूर, आमदाबाद व शिरुर ग्रामीण या गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी सहभागी झाले होते.
कंपनीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई तातडीने मिळावी आणि कंपनीला देण्यात आलेले ६२ एकर शेती क्षेत्र वगळण्यात यावे, या मुख्य मागण्या ग्रामस्थांच्या आहेत. तसेच कंपनी बंद होईपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार असल्याचा निर्धार देखील यावेळी करण्यात आला.