पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकाने दोघांना पकडून त्यांच्याकडून १४ लाख ६० हजार रुपयांचे मॅफेड्रॉन हस्तगत केले आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे आरोपी एक गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराथ हेल्थ क्लबजवळ, लक्ष्मीनगर, येरवडा) आणि तोसिम ऊर्फ लड्डु रहिम खान (वय ३२, रा. दर्गा रोड, कसबा पेठ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ आणि खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी शहराच्या मध्यवर्ती भागात घस्त घालीत होते. त्यावेळी खबऱ्याने त्यांना बॉबी आणि तौसिम खान यांच्याबाबत माहिती दिली. हे दोघे शुक्रवार पेठेतील मारूती मंदिराजवळ थांबले असून, त्यांच्याकडे अमली पदार्थ तसेच पिस्तूल असल्याची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले.
पोलिसांनी सापळा लावत दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १४ लाख ६० हजार रुपयांचा मॅफेड्रॉन (एम डी), देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे व इतर ऐवज असा १६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्टलबाबत चौकशी करता, त्यांच्या विरोधी टोळीचा गेम करण्यासाठी हे पिस्टल आणल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नेमकी कोणाची हत्या करण्यासाठी हे पिस्टल आणण्यात आले होते, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक हे अधिक तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहायक फौजदार सुनिल पवार, पोलीस अंमलदार साहिल शेख, सुरेंद्र जगदाळे, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अझिम शेख, आझाद पाटील, अमोल राऊत, पवन भोसले, निलम पाटील यांनी केली आहे.