कात्रज, (पुणे) : पुण्यातील गुजर-निंबाळकरवाडीच्या नवलाईदरा तलावात रविवारी (ता. १४) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह तलावाच्या पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती पोलीस प्रशासन तसेच कात्रज अग्निशामक दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
निर्मला एकनाथ साठे (वय-६०, रा. भारतनगर, गुजर-निंबाळकरवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. सदरची महिला मतिमंद असून घरातून कधीही निघून जात होती, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेदरम्यान गुजर-निंबाळकरवाडीच्या नवलाईदरा तलाव परिसरामध्ये बघ्यांची गर्दी जमलेली होती. कात्रज अग्निशमन दलाचे प्रमुख प्रदीप खेडेकर, चालक गणेश भंडारे, फायरमन पंकज इंगवले, निलेश राजीवडे, अभिषेक खाटपे, योगेश कुंभार, विनायक घागरे यांच्यासह भारती विद्यापीठ पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.