पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याचे काही तास उलटत नाही, तोच आता पुण्यातील एका गुंडासोबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. कुख्यात गुंडांच्या वर्षा बंगल्यावरील कथित भेटीगाठींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा टीका केली आहे.
अशातच आता संजय राऊत यांनी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार संतोष बांगर यांचा कथित फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत, महाराष्ट्रात गुंडा राज.. गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य’ असं म्हणत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
कोण आहे निलेश घायवळ?
कुख्यात गुंड निलेश घायवळ हा पुण्यात गॅंगस्टर म्हणून ओळखा जातो. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे १४ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे असे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न असेही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. घायवळ हा टोळी करून गुन्हे करत असल्याने पुणे पोलिसांनी २०२१ मध्ये त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात घायवळला स्थानबद्ध केले होते. आता त्याच निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्वीट करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात गुंडा राज! काय म्हणाले संजय राऊत ट्वीट
संजय राऊतांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने पुण्याची ही काय अवस्था करुन ठेवली आहे?
महाराष्ट्रात गुंडा राज:
गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!
हे महाशय कोण आहेत?
त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे… pic.twitter.com/n1L3722t1c— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2024