पुणे : राज्यात सद्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. आगामी विषाणसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे बड्या नेत्यांच्या भेटी घाटी होऊ लागल्या आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शनिवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अतुल बेनके हे अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
खासदार अमोल कोल्हेच्या घरी ही भेट झाली असून याला शरद पवारांनी ही दुजोरा दिला आहे. ते आता कोणत्या पक्षात आहेत? मला ते अजित पवार गटात आहेत, याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळं यावर फार चर्चा नको, अशा कडक शब्दांत शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काही राजकारण होत असेल तर..
शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुमच्या पक्षात येणार का? ते तुमच्या भेटीसाठी का आले होते? याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर शरद पवार यांनी म्हटले की, यामध्ये नवीन काय आहे? आमच्यात काही चर्चा झालेली नाही. लोक भेटायला येतात. अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, त्याची इथे चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केले ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी आहे, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.
बेनके यांनी अमोल कोल्हे यांना मदत केली..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तटस्थ भूमिका घेणाऱ्या आमदारांमध्ये अतुल बेनके यांचा समावेश होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला होता. अतुल बेनके यांचे जुन्नर विधानसभा क्षेत्र शिरुर मतदारसंघात येते. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीत अतुल बेनके यांनी अमोल कोल्हे यांना मदत केली का?, अशी चर्चा आता सगळीकडे होऊ लागली आहे.
अतुल बेनके काय म्हणाले?
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अतुल बेनके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजकारणात काहीही घडू शकतं, अगदी शरद पवार आणि अजित पवार ही एकत्र येऊ शकतात. त्यामुळं पुढं काहीही घडू शकतं. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी तुतारी वाजविण्याचे सूचक विधान केले आहे.