पिंपरी : “सुयोग्य ध्यानामुळे मन स्थिर होते अन् त्यातून भगवंताची प्राप्ती होते,” असे प्रतिपादन कीर्तनकार मकरंदबुवा करंबेळकर यांनी केले. ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथील मनोहर वाढोकर सभागृहात श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आयोजित समर्थ रामदास स्वामी पादुकांच्या आगमनानिमित्त मकरंद करंबेळकर यांनी कीर्तनसेवा रूजू करताना गोसावीनंदन महाराज यांच्या “देव गजानन ध्यायी…” या भक्तिरचनेवर निरूपण केले.
चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय आणि मोरयानंदन महाराज यांनी भोजनसमयी आपल्या उपास्य दैवतांना सहभोजनासाठी आवाहन केले होते, तो प्रसंग करंबेळकर महाराजांनी कथन केला. हिंदू धर्मात ३३ कोटी देव मानले जातात; परंतु येथे ‘कोटी’ या शब्दाचा अर्थ प्रकारचे असा असून, ‘यत्न तो देव जाणावाा!’ या उक्तीवर समर्थांचा विश्वास आहे, असे सांगितले. करंबेळकर यांना बाळासाहेब चव्हाण (हार्मोनियम), विश्वनाथ पुरोहित (तबला) आणि अभिषेक दामले (स्वरसाथ) यांनी साथसंगत केली. दुपारी वैदेही भजनी मंडळाने भजनसेवा रुजू केली.
दरम्यान, भव्य स्वागत कमानी उभारून, पारंपरिक वेशभूषेतील महिला लेझीमपथक आणि मंगलदायी शंखनाद करीत मिरवणूक काढून, पुष्पवृष्टी करीत आणि पंचारतीने ओवाळून शुक्रवारी सज्जनगड येथील रामदास स्वामींच्या पादुकांचे भाविकांनी उत्साहात स्वागत केले.
याप्रसंगी सज्जनगड येथे होणारे सर्व दैनंदिन धार्मिक विधी शनिवार (ता. १६) डिसेंबरपर्यंत मनोहर वाढोकर सभागृहात केले जातील, अशी माहिती श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी दिली. सकाळी ६ वाजता होणाऱ्या काकड आरतीपासून ते रात्री ९:३० वाजता होणाऱ्या शेजारतीदरम्यानच्या पादुका पूजा, सांप्रदायिक भिक्षा फेरी, भजन सेवा, कीर्तन आणि प्रवचन या धार्मिक विधींचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.