पुणे : पुणे महापालिकेचे २०२४-२५ वर्षीचे ११ हजार ६०१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजूर केले. यामध्ये समाविष्ट गावांतील विकासासाठी ५५० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठीही मोठी तरतूद केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील कार्यकाळात मांडण्यात आलेल्या बहुतांश योजनेची कामे सध्या सुरू असून, तीच कामे पूर्ण करण्यास महापालिका आयुक्त, प्रशासकांनी प्राधान्य दिले आहे. मिळकतकरात करवाढ नसलेले आणि कोणत्याही नव्या महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश नसलेले हे अंदाजपत्रक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी ११ हजार ६०१ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला गुरुवारी सादर केले. चालू आर्थिक वर्षाच्या (२०२३-२४) अंदाजपत्रकात २०८६ कोटींची वाढ करत ते फुगविण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षातील मार्च अखेरपर्यंत ९ हजार ५१५ कोटींचे उत्पन्न महापालिकेने अपेक्षित धरले होते. मात्र, फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत ६ हजार कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे किमान तीन ते सव्वा तीन हजार कोटींची अंदाजपत्रकीय तूट आली आहे. त्याचा परिणाम एक एप्रिलपासून अंमलबजावणी होणाऱ्या अंदाजपत्रकावरही दिसून येणार आहे. उत्पन्नासाठी शासनाच्या अनुदानावर विश्वास ठेवण्यात आल्याने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत आयुक्तांना करावी लागणार आहे.
मेट्रोचे नवीन रूट, पीएमपीएमएलसाठी ५०० बसेस, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या मिस्सिंग लिंकच्या कामासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जायका अंतर्गत सुरू असलेले एसटीपी प्लांट उभारणी, नदी काठ सुधार योजना ही कामे देखील मार्गी लावण्यात येतील. शहरातील तीन तलावांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. कचऱ्यापासून वीज आणि हायड्रोजन निर्मितीचे प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी मॉडेल स्कूल योजनेत अधिकच्या शाळा घेण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी जेनेरिक स्टोरची संख्या वाढवण्यात येणार आहे.
पुणेकरांना काय मिळणार?
– नवीन कॅथ लॉब सुरु करणार
– कॅन्सर तपसाणीसाठी सेंटर उभारणार
– महापालिकेच्या १९ रुग्णालयांमध्ये स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी मेडिकल सुरु करणार
– वैद्यकिय महाविद्यालयाचे काम पूर्ण करणार, ५०० बेडचे रुग्णालय उभारले जाणार
– ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प सुरु करणार
– वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट, १३ मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट
– ६०० हेक्टरमध्ये टीपीस्कीम
– बाणेर भागात भाड्याने घर उपलब्ध करुन देणार
– महापालिका हद्दीत ८ उड्डाणपूलाचे कामे करणार
– यंदा कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण करणार
– ३५० किलोवॉट हायड्रोजन वीज निर्मितीचे उद्दिष्ट
– अण्णाभाऊ साठे स्मारक
– भीडे वाड्याचे काम सुरु करणार
– महात्मा फुले स्मारकराच्या कॉरीडॉरचे काम सुरु करणार
– २०० फायरमनची भरती करणार
– बाणेर, खराडी, धायरी, महंमदवाडी, बावधन या ठिकाणी फायर स्टेशन उभारले जाणार
– नवीन हॉटमिक्स प्रकल्पांचा प्रस्ताव
भाड्याने घर देणार
शहरातील वाढती लोकसंख्येचा विचार करता तसेच नव्याने महापालिका हद्दीत राहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता, त्यांच्यासोयीसुविधेचा विचार देखील महापालिकेकडून केला जात आहे. महापालिकेने नुकतीच पंतप्रधान आवास योजना यशस्वी करुन दाखविली. सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यानंतर आता महापालिकेने भाड्याने घर देण्याची नवीन योजना यंदा लागू केली आहे. बाणेर भागात महापालिकेच्या सुमारे ६००० एकर जागेवर बांधकाम प्रकल्प राबवून भाड्याने घर दिले जाणार आहे.
थकबाकी वसुलीला प्राधान्य
पुढील वर्षभरात मिळकतकरातून २ हजार ५४९ कोटी ७९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत महापालिकेला या माध्यमातून दोन हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर अद्यापही तीनशे कोटींची वसुली झालेली नाही. उत्पन्नवाढीसाठी थकबाकी वसुलीला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी शासकीय अनुदान स्वरूपात मिळेल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे ४५० कोटींचे कर्जही घेण्याचे प्रस्तावित आहे.
आचारसंहितेचा फटका
महापालिकेने अंदाजपत्रक सादर केले असले तरी, लोकसभा, त्यानंतर विधानसभा आणि पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीला आचारसंहितेचाही फटका बसणार आहे. सातवा वेतन आयोग, कर्मचारी भरती, त्यांचे वेतन, देखभाल दुरुस्ती आणि सेवक वर्गावरही महापालिकेला मोठा खर्च करावा लागणार आहे.
शहराला योग्य दिशा दाखविणारे बजेट
शहराला योग्य दिशा दाखविणारे हे बजेट आहे. पुणेकरांच्या राहणीमान उंचावण्यासाठी मोठी मदत होणार आहे. शहरात चांगले रस्ते, गार्डन, परिसरात स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याचा देखील विचार करण्यात आला आहे. तसेच या बजेटनुसार राबिण्यात येणाऱ्या योजना पुणेकरांना फायदेशीर ठरतील.
विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका