लोणी काळभोर : नववर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी एक प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी आज मंगळवारी (ता.१०) पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. नवीन वर्ष हे सुख, समृद्धी, भरभराटी आणि आरोग्यदायी जावो. व कोणतेही संकट पुन्हा येऊ नये. अश्या मागण्या भक्तांनी श्रींच्या चरणी केल्या आहेत.
नववर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी योग आला आहे. थंडीचा कडाका असूनही आज श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. मंगळवारी (ता,१०) पहाटे मकरंद आगलावे यांनी श्रींची पूजा करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करून दिले.
संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, पायघड्या सावलीसाठी मंडप व्यवस्था तसेच भाविकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली होती. आगलावे बंधूंच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. तसेच दुपारी भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाची खिचडी व चिवडा वाटप करण्यात आले.
यावेळी प्रथमच होमारू कंपनी व यू ट्यूब च्या माध्यमातून भाविकांना घरी बसल्या श्री चिंतामणीच्या लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात आली होती. संध्याकाळी ह.भ.प शिवाजी महाराज आळंदी यांचे सुवाश्र कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघाला. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
तसेच थेऊर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तर या सर्व कार्यक्रमावर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे लक्ष ठेऊन होते.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विष्णु देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.