हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : अनुसूचित जातीचे लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण करण्यात यावे व मातंग समाजाच्या मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी करणारा ठराव विधिमंडळात सादर करावा, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट यांनी निवेदनाद्वारे आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वात १६ नोव्हेंबरपासून मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गंजपेठ येथील आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या तालमीपासून पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पदयात्रेची सुरुवात झालेली आहे. ही पदयात्रा १३ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे. या पदयात्रेचे महामोर्चात रूपांतर होणार आहे. या वेळी सरकारला वेगळी आंदोलने पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजयभाऊ सकट यांनी दिली.
राज्यातील मातंग समाज मागील अनेक वर्षांपासून अनुसूचित जातीसाठी एकत्रित असलेल्या १३ टक्के आरक्षणाची अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करण्याची मागणी करत आहे. आजपर्यंत एकत्रित आरक्षण पद्धतीचा लाभ १ किंवा २ जातींनाच होत असल्याची ओरड महाराष्ट्रसह देशातील इतर अनेक राज्यांतून होत असल्याने अनुसूचित जाती आरक्षणाची व योजनांची अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करण्याकरिता देशभरामध्ये आंदोलने होत आहेत. त्यासाठी केंद्र सरकार व देशातील काही राज्यांनी याविषयी आयोग स्थापन केला होता. त्या सर्वच आयोगांनी अनुसूचित जाती एकत्रित आरक्षणाची अ, ब, क, ड नुसार वर्गीकरणासंदर्भात स्पष्टपणे शिफारसी केल्या आहेत.
राज्यातील अनुसूचित जाती गटातील ५९ जातींना १३ टक्के एकत्रित आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, आरक्षणाचा सर्वाधिक लाभ शैक्षणिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम व आक्रमक असलेल्या जातीच घेत आहेत. अनुसूचित जाती गटातील जवळजवळ ५६ ते ५७ जाती या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. या जातींची संख्या ३० ते ४० टक्के असून सुद्धा शिक्षण व नोकरीतील आरक्षणासोबतच शासकीय योजनांचा लाभ देखील त्यांना मिळालेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी आमदार अशोक बापू पवार यांनी निवेदन स्वीकारून, मातंग समाजाच्या मागण्या विधान परिषदेमध्ये मांडून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजनैतिक, सांस्कृतिक न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नितीन लोखंडे, मयूर सकट, सुजल शेंडगे, व मान्यवर उपस्थित होते.