बापू मुळीक / सासवड : सासवड (ता. पुरंदर) खंडोबा नगर येथे शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीत बाबुराव साहेबराव जाधव, प्रकाश साहेबराव जाधव, अशोक साहेबराव जाधव यांची तीन घरे जळून खाक झाली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घरातील लहान मुले घराबाहेर पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून जाधव कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाली.
घराला आग लागलेले नागरिक डोंबारी समाजाचे असून लग्न समारंभासाठी, बिगारी कामकाजासाठी, सकाळी बाहेर पडतात. तर संध्याकाळी काम उरकल्यानंतर ते परत येतात. रोजंदारी करून आपली उपजीविका करतात, दरम्यान, त्यांचे घरातील सर्व साहित्य जळाले असून, राहायला आता घर नाही. उपाशी राहावे लागणार, हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.