शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पती व सासूच्या वादातून एका विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पौर्णिमा गणेश धोत्रे (वय २२, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत विवाहितेचे वडील रामदास गेनबा जाधव (वय ५० डोंगरगाववाडी, लोणावळा ता. मावळ जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती गणेश तानाजी धोत्रे, सासू मंगल तानाजी धोत्रे (दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे), नणंद सोनाली लखन ननवरे (रा. खर्डा ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत गणेश धोत्रे व मंगल धोत्रे या दोघांना अटक केली आहे.
पौर्णिमा धोत्रे हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता. विवाहानंतर पोर्णिमाचा पती गणेश, सासू मंगल तसेच नणंद सोनाली पोर्णिमाला किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत तू जेवण जास्त बनवते, ते वाया जाते. तुझ्यामुळे आमची बरबादी झाली, तू आमच्या घरातून निघून जा असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने तसेच होणाऱ्या त्रासाला कंटाळून ३० मार्च रोजी पोर्णिमा हिने घराला बाहेरुन कडी लावून इमारतीच्या छतावर जात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. दरम्यान पोर्णिमा गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.