पुणे : आंबेडकर नगर परिसरात एका व्यक्तीला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी शारदा गजानन मंदिराजवळ ही कारवाई करत प्रकाश देवराम परिहार उर्फ पक्या (वय-२५ रा. राम मंदिराजवळ, लोहीया नगर, पुणे) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवजयंतीच्या मिरवणूका असल्याने पोलिसांकडून हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी, फरार आरोपींची चौकशी करण्यात येत होती. त्यावेळी पोलीस अंमलदार गायकवाड यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश परिहार शारदा गजानन मंदिराजवळ असलेल्या पान टपरीजवळ उभा आहे.
त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याची पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास केला असता त्याच्याकडून ८५ हजार रुपयांचे सहा मोबाईल, दुचाकी, गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार थोरात, जाधव, गायकवाड, यादव, झायटे यांच्या पथकाने केली.