-राहुलकुमार अवचट
यवत : दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी यवतची बाजारपेठ सजली आहे. आज आठवडे बाजार व उद्या दसरा असल्याने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. तसेच, मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली असून झेंडूच्या फुलांची जोरात विक्री सुरू आहे. फुलांना प्रति किलो 120 ते 150 रुपये असा भाव मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर दुसरीकडे, भाव वाढूनही ग्राहकांकडून फुलांची खरेदी जोरदार सुरू असल्याने विक्रेते आनंदून गेल्याचे चित्र दिसत आहे.
शारदीय नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच दसरा तथा विजयादशमी भारतीय संस्कृतीत हा शुभ दिवस मानला जात असल्याने दसरा सणाला भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याला या दिवशी मुहूर्त केला जातो. या दिवशी झेंडूच्या फुलाला विशेष मागणी असते. विजयादशमीच्या दिवशी घरांना झेंडूच्या फुलांची तोरणे, वाहनांना हार, पुजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. त्यामुळे झेंडूच्या फुलांना यादिवशी विशेष मागणी असते.
विजयादशमी निमित्त यवतची बाजारपेठ यंदा झेंडूच्या फुलांच्या विक्रीसाठी सजली असून आजच आठवडे बाजार असल्याने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या सेवा मार्गावर दुतर्फा, स्टेशन रोड चौकात फुल विक्रेत्यांनी झेंडुची फुले व आपट्याची पाने विक्रीसाठी आणली आहेत तर यातच फळ, कटलेरी व किरकोळ विक्रेते बसल्याने सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मागील वर्षी 80 रुपये किलो असलेली झेंडूची फुले यावर्षी प्रति किलो 120 ते 150 असा भावात ग्राहकांना खरेदी करावी लागत होती. ठोक बाजारात झेंडूच्या फुलांना कमी बाजार असला तरी ग्रामीण भागात मात्र झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्याने बाजारपेठत दर जास्त असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक शेतकऱ्यांनी मार्केटयार्डला फुले न पाठविता गावातील बाजार पेठेत स्वतः विक्री करत असल्याचे दिसून आले तर काहींनी व्यापाऱ्यांना कमी किंमतीत फुले विक्री केली.
सेवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी – महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष
दरवर्षी दसरा निमित्ताने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर फुल विक्रेते बसत आहेत. आजच आठवडे बाजार असल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामना करावा लागला. परंतु या वाहतूक कोंडीकडे महामार्ग प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे चित्र पुन्हा एकदा नागरिकांना अनुभवायला मिळाले .
वाहतूक कोंडीतून सुटका होणार कधी
दर शुक्रवारी होणारी वाहतूक कोंडी यातून यवतकरांची सुटका कधी होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत यासाठी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व महामार्ग प्रशासनाने उपयोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.