पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एकदा गांजा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठातील स्किल डेव्हलपमेंट विभागाचे विद्यार्थी वसतिगृहात अमलीपदार्थाचे सेवन करत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडे केली होती. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती मिळत आहे.
विद्यापीठाच्या वसतिगृहात यापूर्वीसुद्धा गांजा सापडल्याची घटना समोर आली होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने सापडलेला गांजा पोलिसांकडे न देता विद्यापीठाकडेच ठेवला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. विविध विद्यार्थी संघटनांसह राजकीय संघटनांनीसुद्धा या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याची माहिती समोर आल्याने विद्यापीठ वर्तुळात मोठा गोंधळ उडाला आहे.
विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ५ मधील एका खोलीत विद्यार्थी गांजा ओढत असल्याची तक्रार विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने बुधवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास सुरक्षा विभागाकडे केली. त्यावर सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनेची पाहणी केली. विद्याथ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार सुरक्षा विभागाने तक्रारदार विद्यार्थी व गांजा ओढत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे.