पुणे : मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्यात सर्वच ठिकाणी सरकारकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली वादात सापडली आहे. १८० प्रश्नांच्या प्रश्नावलीवर काहींनी आक्षेप नोंगवला आहे. काहींना ही प्रश्ने अपमानास्पद वाटली. तर, काहींना मूर्खपणाचा कळस वाटला.
हुंडा मागता?, लग्नाचे वय कोणते?
या प्रश्नावलीमधील काही प्रश्नांवर मराठा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ‘‘लग्न जुळवताना हुंडा मागता का?, तुमच्याकडे लग्नाचे वय कोणते 12 ते 15 की 16 ते 18?’’ असे प्रश्न विचारून शासनाला खरंच आमचे मागासलेपण तपासायचे आहे? की आम्हाला गुन्हेगार ठरवायचेय?, हा अदृश्य कट नाही ना?, असा सवालही मराठा बांधवाकडून उपस्थित केला जात आहे.
नवसासाठी बळी देता?
31 जानेवारीपर्यंत अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मात्र मराठा समाजाचे मागासलेपण ज्या प्रश्नावलीच्या आधारे तपासले जाणार आहे तिच्यावरच प्रश्नचिन्हे उपस्थित केले गेले आहे. या प्रश्नावलीमध्ये, ‘‘तुमच्या समाजात विवाहित स्रिया डोक्यावर पदर घेतला का?, पदर घेणे बंधनकारक आहे का?, विधवांना हळदी-कुंकवाला आमंत्रित करतात का?, विधवांना कुंकू लावण्याची, मंगळसूत्र घालण्याची मुभा आहे का?, विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का?, नवसासाठी कोंबडा/बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे का?’’, अशा प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्नांवर मराठा समाजाचा आक्षेप आहे.
आंतरधर्मीय विवाह झाला आहे का?
या प्रश्नावलीतील दोन प्रश्नांवर मराठा समाजातूनच आक्षेप नोंदवले आहेत. ज्यात ‘‘तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का?’’ असे विचारण्यात आले आहे. तर दुसऱ्या प्रश्नात ‘‘तुमच्या समाजात महिला पडदा/बुरखा वापरतात का?’’ असे विचारण्यात आले आहे. सरकारला या प्रश्नांच्या उत्तरातून नेमके काय शोधायचे आहे. मराठा समाजात बुरखा कोण वापरतो?, ‘बुरखा’ हा विशिष्ट शब्द यात कसा आला? सरकारचा तसा काही छुपा अजेंडा तर नाही ना? असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. ही प्रश्नावली अतिशय घाईने व पुरेशी तयारी न करता निश्चित करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. यात वापरलेली मराठी भाषाही फारच चुकीची आहे, असे काहींचे म्हणणे आहे.