पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी काढलेली पदयात्रा बुधवारी पुणे शहरात दाखल झाली. पदयात्रा मार्गावर मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे या पदयात्रेला सुमारे नऊ तास उशीर झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवासह जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून निघाले आहेत. ही पदयात्रा मंगळवारी (दि. 23) दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाली होती.
पदयात्रेचा पुणे शहरातील मार्ग नगर रस्ता, येरवडा, सादलबाबा चौक, संगमवाडी पूल, संचेती चौक, वेधशाळा चौक, गणेशखिंड रस्ता, ओैंध असा ठरवण्यात आला होता. बुधवारचा मुक्काम लोणावळा येथे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून पदयात्रेत सहभागी होणार आहेत. नियोजनानुसार पदयात्रा बुधवारी सकाळी नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान शिवाजीनगर येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ठिकठिकाणी होणारे स्वागत आणि मराठा बांधवांची गर्दी यामुळे ही पदयात्रा कासवगतीने पुढे जात आहे.
त्यानंतर पदयात्रा बुधवारी दुपारी 12 वाजता सांगवी फाटा येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, रात्रीचे साडेआठ वाजले तरी ही पदयात्रा सांगवी फाटा येथे पोहचली नव्हती. ही पदयात्रा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या मार्गावरून भक्ती शक्ती मार्गे मुंबईच्या दिशेने जाणार होती. मात्र, पदयात्रेला लोणावळ्यात पोहचण्यास मध्यरात्र होणार आहे.