पुणे : एकीकडे आरक्षणासाठी उपोषण सुरु असताना दुसरीकडे मराठी समाजाच्या तरुणांचे आत्महत्यांचे सत्र थांबत नाहीत. आता बार्शी येथील तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी बार्शीतील युवकाने बुधवारी सकाळी पुण्यात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव प्रसाद देठे आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. प्रसाद देठे यांना पत्नी, 2 मुली व एक मुलगा असा परिवार आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद देठे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे.
प्रसाद देठे यांनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
जयोस्तु मराठा,
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.
जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.
मला माफ करा.
– तुमचाच प्रसाद