पुणे : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची एल्गार पुकारला आहे. जरांगे-पाटील पदयात्रेच्या माध्यमातून मुंबईला निघाले आहेत. आज ही पदयात्रा पहाटे चारच्या सुमारास खराडी येथे पोहोचली. खराडी येथून जरांगे पाटील सकाळी लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी सकाळपासूनच बदल करण्यात येणार आहेत. नगर रस्ता, येरवडा, जहाँगीर चौक, संचेती चौक, गणेशखिंड रस्ता, ओैंध, सांगवी, डांगे चौकमार्गे पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आहे. यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
लोणीकंद, थेऊर फाटा, केसनंद, थेऊर ते सोलापूर रस्ता, वाघोली आव्हाळवाडी, मांजरी, केशवनगर, मुंढवामार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी पोहचावे. नगरहून पुणे शहराकडे येणारी वाहतूक वाघेश्वर मंदिरापासून बंद करण्यात येणार आहे. पदयात्रा मार्गस्थ झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी सांगितले. नगरहून पुणे शहराकडे येणारी वाहतूक शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे वळविण्यात येणार आहे.
पुण्यातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपास चौकातून मगरपट्टा चौकात जावे. तेथून सोलापूर रस्तामार्गे थेऊर फाटा केसनंद ते लोणीकंद रस्त्याने वाहनचालकांनी नगर रस्त्यावर यावे. खडकीतील होळकर पूल आणि येरवड्यातील सादलबाबा चौकातून येणाऱ्या वाहनचालकांनी चंद्रमा चौक, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जावे. येरवड्यातील डॉ. आंबेडकर सेतूकडे जाणारी वाहतूक आवश्यकता भासल्यास कोरेगाव पार्क चौकातून वळविण्यात येईल. बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकातून डॉ. आंबेडकर सेतूकडे जाणारी वाहतूक आवश्यकता भासल्यास कोरेगाव पार्क चौकाकडे वळविण्यात येणार आहे. पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चौक, जहांगीर चौकातून नगर रस्त्याकडे जाणारी वाहतूक आवश्यकता भासल्यास वळविण्यात येईल.
प्रादेशिक परिवहन चौकातील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक, खडकीतील पोल्ट्री फार्म चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक होळकर पुलाकडे वळविण्यात येईल. मुळा रस्ता चौक, पाटील इस्टेट चौक येथील वाहतूक वळविण्यात येईल. जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे भुयारी मार्ग, वेधशाळा चौक, चापेकर चौक, वाकडेवाडी, नर्गीस दत्त रोड, सूर्यमुखी दत्त मंदिर चौक, संगान्ना धोत्रे पथ, सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.
महाबळेश्वर हॉटेल, बाणेर-पाषाण लिंक रस्ता मार्गे सूस रस्ता, शिवाजी चौक, पाषाणमार्गे किंवा सूस खिंडमार्गे चांदणी चौक कोथरूड ते पुणे शहर अशी वाहतूक वळविण्यात येईल. बाणेर परिसरामधील वाहतूक अभिमानश्री सोसायटी चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, पाषाणमधील शिवाजी चौक, चांदणी चौक, कोथरूडमार्गे पुणे शहरकडे वळविण्यात येईल. ओैंध आणि बाणेर रस्त्यावरून शिवाजीनगरकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास वळविण्यात येईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सांगवीकडे जाणारी वाहने आवश्यकतेनुसार पाषाण, बाणेरकडे वळविण्यात येतील. ओैंधमधील ब्रेमन चौकातून येणारी वाहने हॅरीस पूलमार्गे पिंपरी-चिंचवडकडे सोडण्यात येतील.