पिंपरी : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आंदोलनाच्या मागणीसाठी त्यांनी काढलेली पदयात्रा बुधवारी (ता. २४) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होत आहे. त्यानिमित्त उद्या सकाळपासून शहरातील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. आठ वाहतूक विभागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.
मराठा आंदोलकांची पदयात्रा राजीव गांधी पूल, जगताप डेअरी, डांगे चौक, बिर्ला रुग्णालय, चापेकर चौक, अहिंसा चौक, महावीर चौक, खंडोबामाळ चौक, टिळक चौक भक्ती-शक्ती, पूना गेट, देहूरोड, तळेगाव मार्गे मुंबईकडे जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी सहापासून वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
पिंपळे निलख कडून येणारी वाहने रक्षक चौकाकडे न येता ती विशालनगर डीपी रोडने जगताप चौक-कस्पटे चौक मार्गे जातील. जगताप डेअरी पुला खालील चौकामध्ये कस्पटे चौकाकडून येणारी वाहने डाव्या व उजव्या बाजूने औंध – रावेत रोडला न येता ग्रेड सेपरेटरमधून शिवार चौक, कोकणे चौकाकडून जातील. शिवार चौकाकडून येणारी वाहतूक उजव्या डाव्या बाजूने औंध रावेत रोडला न येता ती सरळ समतल विलगकामधून कस्पटे चौकातून जातील. तापकीर चौक, एमएम चौकाकडून काळेवाडी फाटा पुलाकडे वाहनांना प्रवेश बंद असून, या मार्गावरील वाहने रहाटणी फाटा चौकातून रहाटणी गाव गोडांबे चौकाकडून जातील. सांगवी गावातून सांगवी फाट्याकडे येणारी वाहने शितोळे पंप जुनी सांगवी व वसंतदादा पुतळा जुनी सांगवी दापोडी मार्गे जातील. औंध डी-मार्टकडून सर्व प्रकारच्या वाहनांना सांगवी फाट्याकडे येण्यास प्रवेश बंदी असून, या मार्गावरील वाहने पोल चौक येथून डावीकडे नागराज रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
ताथवडेगाव चौकाकडून डांगे चौकाकडे येणारी वाहने ताथवडे चौकामधून उजवीकडे वळून ताथवडे भुयारी मार्ग (अंडरपास) किंवा परत हँगिंग पूल, काळाखडक येथून डांगे चौकाकडे जाणारी वाहने काळाखडक येथून यु टर्न घेवून भूमकर चौक मार्गे जातील. वाकड दत्तमंदिर रोडने डांगे चौकाकडे येणारी वाहने अण्णाभाऊ साठे चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळून जातील. छत्रपती चौक कस्पटे वस्ती येथून काळेवाडी फाट्याकडे येणारी वाहने छत्रपती चौक येथून डावीकडे वळून जातील. थेरगाव फाट्याकडे येणारी वाहने उजवीकडे वळून जातील किंवा यु-टर्न घेवून तापकिर चौकाकडे जातील. कावेरीनगर पोलीस वसाहतीकडून येणारी वाहने वाकड भाजीमंडई समोरील कॉर्नर येथून डावीकडे याकड पोलीस स्टेशनकडील रस्त्याने दत्त मंदिर रोडने जातील.
रिव्हर व्ह्यू चौकातून डांगे चौक तसेच डांगे चौकाकडून महावीर चौकाकडे येणारी वाहने चिंचवडे फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी रावेत मार्गे तसेच भोसरीकडे जाणारी वाहने बिजलीनगर वाल्हेकरवाडी मार्गे जातील. चिंचवडे नगर टी जंक्शनकडे रिव्हर व्ह्यू कडून जाणारी वाहने रावेत मार्गे जातील. दळवीनगर चौकाकडून खंडोबामाळ व चिंचवड स्टेशनकडे जाणारा रोड बंद राहणार असून या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने जातील.
लिंकरोड पिंपरी कडून येणारी वाहने चापेकर चौकात न येता ती मोरया रुग्णालय चौक केशवनगर मार्गे जातील. बिजलीनगर चौकाकडून येणारी वाहने रावेत मार्गे जातील. मुकाई चौकाकडून चिंचवडकडे येणारी वाहतूक वाल्हेकरवाडीतून भेळ चौक मार्गे पुढे काचघर चौकातून डावीकडे वळून पुढे यु-टर्न घेऊन भक्ती शक्ती चौकातील भुयारी मार्गातून अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे जातील. लोकमान्य रुग्णालय चौक, चिंचवड या मार्गावरील वाहने दळवीनगर मार्गे जातील. चिंचवड मार्गाने खंडोबा माळ चौकाकडे जाणारी वाहने बिजलीनगर चौक मार्गाने जातील.
निरामय रुग्णालयाकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजूकडे वळून मोरवाडी चौक मार्गे जाईल. परशुराम चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाणारी वाहने थरमॅक्स चौक मार्गे जाईल. थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक आर. डी. आगा मार्गाकडून गरवारे कपंनीपासून टी- जॅक्शन वरुन खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर मार्गे जाईल. दळवीनगर पुलाकडून येणारी वाहतुक आकुर्डी गावठाण मार्गे जाईल. दुर्गा चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता ती थरमॅक्स चौकाकडे किंवा यमुनानगर मार्गे जाईल. भेळ चौकाकडून येणारी वाहतूक सावली हॉटेल मार्गे जाईल. अप्पूघर/रावेतकडून येणारी वाहतूक भक्ती शक्तीतील भुयारी मार्गाने अंकुश चौक, त्रिवेणीनगर मार्गे जाईल.
पुणे, खडकी, दापोडी, फुगेवाडी बाजूकडून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणारी वाहने नाशिक फाट्यावरुन मोशी चौक किंवा कस्पटे चौक मार्गे जातील. चाकण, मोशी, आळंदी बाजूकडून नाशिक फाटा मार्गे मुंबई बाजूकडे जाणारी वाहने पांजरपोळवरुन स्पाईन रोडने त्रिवेणीनगर, भक्ती-शक्ती भुयारी मार्ग मधून रावेत मार्गे जातील किंवा नाशिक फाटा कस्पटे चौक वाकड नाका मार्गे जातील.
मुंबई-पुणे महामार्गावरून येणारी वाहतूक बंगळुरू महामार्गने जाईल. मुंबईकडून पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक सेंट्रल चौकातून बंगळुरू महामार्गने जाईल. पदयात्रा जुन्या महामार्गने जाणार असल्याने भक्ती-शक्ती चौक येथे आल्यानंतर वडगाव चौकातून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. तळेगाव चाकण रोड ५४८ डी वरील मुंबईच्या दिशेने जाणारी जड व अवजड वाहने महाळुंग्यातील एच.पी. चौक मार्गे जातील. तळेगाव गावठाणकडून लिंब फाट्याकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजूने जाईल. बेलाडोर मार्गे ए.बी.सी पेट्रोलपंप चौकात येणारी सर्व प्रकारची वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजूने जाईल.