पुणे : मनोज जरांगे पाटील यांची मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आज ते मुंबईच्या वेशीवर पोहोचतील. हजारो आंदोलकांसह आपल्या वाहनांनी ते मुंबईकडे येत आहे. सर्वसामान्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने लोणावळ्याकडून मुंबईकडे येाताना जुन्या मुंबई-पुणे हायवेने यावे, असे आवाहन केले होते. जरांगे यांनी पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जुन्या मुंबई-पुणे हायवेने येण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एक्स्प्रेस वेवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर रॅपिड ॲक्शन फोर्स आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप आले आहे.
लोणावळ्यात आज मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. आता ते नवी मुंबईकडे रवाना होणार आहेत. आंदोलक नवी मुंबईत आल्यानंतर त्यांच्या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार लाखो मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलावची व्यवस्था केली आहे. घराघरांत भाकरी तयार केली जाणार आहेत.
मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा मोर्चा, प्रजासत्ताक दिन यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात २३ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे.