केडगाव / संदीप टूले : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचे पडसाद गेल्या तीन-चार दिवसात संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. तर या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील एक नंबरची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या केडगाव येथील मराठा बांधवांनी ‘केडगाव बंद’ची हाक दिली आहे. या बंदला केडगाव येथील मुस्लिम, धनगर व ओबीसी समाजातील विविध संघटनानी पाठिंबा दर्शवला आहे.
जालना येथील घटनेनंतर केडगाव येथील सकल मराठा समाजाची आणि मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक झाली. या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जालना येथील घटनेचे संपूर्ण पुणे जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. तर काही ठिकाणी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर टायर पेटवून देऊन जालना येथील घटनेचा निषेध केला.
तसेच याच घटनेच्या निषेधार्थ माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा समाजाची एक बैठक झाली. याच दरम्यान सर्वांच्या मते दौंड तालुका बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड येथे उद्याच मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.