पुणे : राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात मोठी घट होत असून, अनेक जिल्हे गारठले आहेत. राज्यात मंगळवारी किमान तापमान अहिल्यानगर येथे ९.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. पुणे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे.
उत्तरेकडून थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने महाराष्ट्राच्या काही भागातील कमाल किंवा किमान तापमानात घट होताना दिसत आहे. गेले काही दिवस किमान तापमानात वेगाने घट होत आहे. त्यामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान मंगळवारी नोंदवले गेले. पहाटे धुके पडत असून, दिवसभर हवामान कोरडे राहत आहे. कोकण भागातही किमान तापमान घटले आहे. पुण्यातही तीव्र गारठा जाणवत आहे. राज्यात कमाल तापमान अलिबाग येथे ३४ अंश सेल्सिअस होते.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई २२.५, सांताक्रूझ १६.८, अलिबाग १६.६, रत्नागिरी १९.६, डहाणू १७.५, पुणे १०.८, लोहगाव १३.९, अहिल्यानगर ९.७, जळगाव ११, कोल्हापूर १५.७, महाबळेश्वर १२.६, मालेगाव १३, नाशिक १०.८, सांगली १५.३, सातारा १२.९, सोलापूर १५.५, धाराशीव १६, छत्रपती संभाजीनगर १२.१, परभणी १२, अकोला १३.४, अमरावती १४.९, बुलढाणा १३.४, ब्रह्मपुरी १२, चंद्रपूर १३.५, गोंदिया १२.२, नागपूर १२, वर्धा १३.४.
पुण्याचा पारा १०.८ अंशांवर
मंगळवारी शहरात किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस, तर एनडीए येथे थंडीचा पारा ९.६ अंशांवर होता. दरम्यान, जिल्ह्यातही थंडीने नागरिक गारठले असून, हवेली येथे किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस होते. दरम्यान, शहरात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
पाषाण ११.३, हडपसर १३.३, कोरेगाव पार्क १५.५, वडगावशेरी १६.६ तर मगरपट्टा येथे किमान तापमान १६.९ अंश सेल्सिअस होते. शहरात कमाल तापमानात किंचित घट झाली असून, ते २८ अंश सेल्सिअस होते. जिल्ह्याच्या किमान तापमानातही घट झाली आहे. मंगळवारी हवेली येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. तर, तळेगाव १०.३, दौंड १०.७, आंबेगाव १०.८, माळीण १०.९, शिरूर ११.५, वारामती ११.७, इंदापूर १२, निमगिरी १२.१, राजगुरूनगर १२.१, ढमढेरे १२.३, पुरंदर १२.४, नारायणगाव १२.६, भोर १४.३, लोणावळा १६.५.