पुणे : प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्या प्रकरणी खेडकर यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. त्यामुळे त्यांना येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, मनोरमा खेडकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी पौड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप खेडकर तसेच अंगरक्षकासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर पसार झाल्या. त्यानंतर त्यांना महाड परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत शेतकरी पांडुरंग कोंडिबा पासलकर (वय-६५, रा. केडगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्या पोलीस काेठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने शनिवारी (१९ जुलै) दिले हाेते. खेडकर यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्यांना पौड येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने खेडकर यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे.