पुणे : आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. तरीही राज्य सरकार जरांगेंच्या मागण्यांचा विचार करत नसल्याने महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक होत आहे. ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यवत येथे महामार्गावर बैलगाड्या आडव्या लावून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पिंपरी चिंचवडचे प्रवेशद्वार असणाऱ्या किवळे येथे आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. मुकाई चौकालगत त्यांनी रस्त्यावर बसून सरकारचा निषेध केला. सरकारने दुर्लक्ष केल्यास मराठा समाज आणखी आक्रमक होईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठआ समाजाचे आंदोलन सुरू आहे. मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यासोबत रास्ता रोकोची परवानगी नाकारल्याने वाघोली परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोली पोलीस चौकीतच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी सरकारचा निषेध करण्यात येत आहे.
नांदेड-हिंगोली, परभणीसह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झालं आहे तसेच जेलभरो आंदोलनही करण्यात येत आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. म्हणजेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल येत्या २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मांडला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.