केडगाव / संदीप टूले : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या आंदोलनास महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंतरवाली सराटीचे लोण आता दौंड तालुकापर्यंत येऊन पोहोचले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी दौंड तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून गावोगावी साखळी उपोषण सुरू आहेत. दौंड शहरासह तालुक्यातून ग्रामीण भागातही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व विविध संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे.
दिवसेंदिवस या आंदोलनची धार वाढत चालली असून, सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला दौंड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये देलवडी, खुटबाव, यवत, मिरवडी, मेमानवाडी, खामगाव, दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील अशा असंख्य गावामध्ये कडकडीत बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तर काही ठिकठिकाणी मूक मोर्चाचे आयोजनही करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारनेही मराठा समाजाचा अंत न पाहता आरक्षण देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. सरकार जेवढं वेळकाढूपणा करेल तेवढे आंदोलन मोठे होत जाणार आहे.
– सागर शेलार, मा. सरपंच, मिरवडी