पुणे : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे पुण्यामध्ये अत्यंत दिमाखात स्वागत करण्यात आले. कडाक्याची थंडी असताना सुद्धा त्याची तमा न बाळगता अवघा मराठा समाज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज होता. यात्रेला अभूतपूर्व गर्दीत जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे पुणेकरांनी स्वागत केली. पुण्यात भल्या पहाटे पाच वाजता जरांगे यांची सभा पार पडली. या सभेला जमलेली न भूतो न भविष्यती गर्दीच मराठा आरक्षणासाठीच्या भविष्यातील लढ्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही देत होती.
मनोज जरांगे पाटील यांनी आज मध्यरात्री दीडच्या सुमारास वडूज येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. भीमा कोरेगाव परिसरामध्ये विजयस्तंभ परिसरात जरांगे पाटलांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोक जमले होते. आबालवृद्ध जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हजर होते.
यात्रेदरम्यान, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जरांगे-पाटील यांच्यासह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली. खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साडेतीन हजार चपात्या, पन्नास किलो शेंगदाण्याची चटणी, ५० किलो लसणाची चटणी यांचे वाटप मराठा बांधवांना करण्यात आले. रांजणगाव गणपती-कारेगाव परिसरातील सर्व गावांत चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती.
दम्यान, हजारो मराठा स्वयंसेवक जरांगे यांना मदतीसाठी सज्ज झाले आहेत. पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलकांना आरोग्यविषयी तक्रारी असल्यास, आरोग्य मदत केंद्रे उभारली जाणार आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा आज सांगवी फाटा येथे दाखल होईल. तेथून रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी असतील.