पुणे: अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने येत्या रविवारी (दि. ११) मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये मनोज जिरंगे पाटील सहभागी होणार आहेत. सारसबाग येथून सकाळी ११ वाजता पायी रॅलीला सुरुवात होणार असून, बाजारीव रस्ता, शनिवारवाडा मार्गे जंगली महाराज रस्त्याने डेक्कन येथील खंडूजी बाबा चौक येथे रॅलीची सांगता होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या पायी रॅलीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून, त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून पायी रॅलीची सुरुवात होईल. बाजीराव रस्ता, शनिवार वाडा यामार्ग शिवाजीनगर येथील मिलिट्री स्कूल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जंगली महाराज रस्त्याने रॅली मार्गस्थ होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जंगल महाराज रस्त्याने पुढे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून डेक्कन येथील खंडूजी बाबा चौक येथे या रॅलीची सांगता होणार आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
अरणेश्वर येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मैदान, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान, आरटीओ येथील एआयएसएसएमएसचे मैदान, फर्ग्युसन कॉलेजचे मैदान, डेक्कन येथील नदीपात्र आदी ठिकाणी वाहने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले. ही रॅली यशस्वी होण्यासाठी दोन हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक नियोजनात काम करीत आहेत.