पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी जालन्यातील आंतरवली सराटी येथे सलग नऊ दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. उपचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, ते पुन्हा एकदा नव्या जोमाने दौरे सुरु करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील, रविवारी (ता. १९) भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत.
जरांगे पाटील रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन वरंधघाट मार्गे भोरला येणार असल्याची माहिती मिळत आहे. भोरमध्ये ४ वाजता सभा घेऊन जरांगे आळंदी येथे मुक्कामी जाणार आहेत. भोर तालुक्यात मनोज जरांगे यांच्या सभेच्या नियोजनासाठी मराठा समन्वयकांच्या बैठका सुरू आहेत. मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहावेत, यासाठी नियोजन सुरू आहे. भोरमधील शेटे मैदानावर संध्याकाळी ४ वाजता जंगी सभा होणार आहे.
मराठा समाजाकडून जरांगे यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने दिलेली मुदत जवळ येत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी झंझावती दौऱ्यांचे नियोजन केले आहे. १५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यामध्ये जरांगे पाटील १९ नोव्हेंबरला भोर तालुक्यातील मराठा समाजाची भेट घेणार आहेत. सभेच्या नियोजनासाठी मराठा समन्वयकांकडून गावोगावी बैठका घेण्यात येत आहेत.
कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने अभ्यासकांद्वारे शोध मोहिम सुरु केली आहे. २४ डिसेंबरपर्यंत सर्व मराठ्यांना आरक्षण देण्याची जरांगे पाटील यांची मागणी आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले दिल्यास, ओबीसी समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी नेते जोरदार विरोध करण्याच्या तयारीत आहेत.