लोणी काळभोर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असताना मंगळवारी (ता. २३) ते लाखो मराठ्यांसह वाघोली (ता. हवेली) येथे मुक्कामी थांबले आहेत. म्हणून आंदोलनकर्त्यांना ‘मदतीचा हात’ देण्यासाठी पूर्व हवेलीतील सकल मराठा समाज पुढे सरसावला असून, वाघोलीत जाऊन आंदोलनकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
वाघोली येथे ५ लाख लोकांच्या भोजनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनात मराठा आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे अन्न अपुरे पडण्याची शक्यता होती. त्यामुळेच सकल मराठा समाजाच्या समन्वयकाने काही पदार्थ बनवून देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पूर्व हवेलीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील महिलांनी या आंदोलनात अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवत आंदोलनकर्त्यांसाठी सुमारे ४ हजार भाकरी अन् 1 हजार चपाती बनवण्यात आल्या. तसेच नागरिकांनी चटणी, पाण्याचे ४० बॉक्स, तीन बॉक्स चटण्या, सुकी भाजी, गुडदाणी, चिवडे, बिस्किटे व लाडू लोणी काळभोर येथील दत्त मंदिरात आणून दिला. त्यानंतर टेम्पो भरून हे अन्नपदार्थ आंदोलनकर्त्यांना वाटप करण्यात आले.
कस्तुरी मंगल कार्यालयात जेवणाची व्यवस्था
उरुळी कांचन सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दाखवून त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सोलापूरकडून ५०० हून अधिक आंदोलनकर्ते पुण्याला चालले होते. या आंदोलनकर्त्यांना मराठा समाजाच्या वतीने कस्तुरी मंगल कार्यालयात जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर वाघोली येथे मुक्कामी आलेल्या मराठा बांधवांना मुरमुरे, बिस्लेरी पाणी, गुडदाणी चिक्की इत्यादी अन्नपदार्थ पाठवण्यात आले.
‘आम्ही तुमच्यासोबत…’
मराठा आंदोलनकर्त्यांचे हलगी व टाळ मृदंगाच्या गजरात उरुळी येथे स्वागत करण्यात आले. तसेच थेऊर सकल मराठा समाजाच्या वतीने कोरेगाव भीमा येथे मुक्कामासाठी असलेल्या आंदोलनकर्त्यांना 300 भाकरी व लसूण, मिरचीचा खर्डा, कारळ, जवस व शेंगदाण्याची चटणी देण्यात आली. त्याबरोबरच आम्ही तुमच्यासोबत आहे, असा पूर्व हवेलीतील सकल मराठा संघाच्या वतीने संदेश देण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी जरांगे आक्रमक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले होते. पण त्यावेळी आणि त्यानंतर सातत्याने सरकारकडून आश्वासन देण्यात आले. त्यांना काही प्रमाणात यश मिळताना दिसतही आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळो अथवा नको मुंबईत मोर्चा घेऊन जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, त्यांची वाटचाल सुरु आहे.
कदमवाकवस्ती व लोणी काळभोरमधून साडेतीन लाख रुपये जमा
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी व मोर्चात सहभागी असलेल्या मराठा बांधवांना जीवनावश्यक उपयोगी व अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदत गोळा करण्याचे कार्य देखील सुरु आहे. यामध्ये कदमवाकवस्ती व लोणी काळभोरमधून ऑनलाईन माध्यमातून साडेतीन लाख रुपये जमा झाल्याची माहिती देण्यात आली.