पुणे : सकल मराठा समाजाकडून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जंगी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील खराडी येथील महालक्ष्मी लाॅन मध्ये २० नोव्हेंबरला सभा होणार आहे. या सभेला होणारी गर्दी विचारात घेता नगर रस्त्यावरील वाहतुकीत सोमवारी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत.
उद्या दिवसभर नगर रोडवर जड वाहतुकीस पूर्णपणे बंदी करण्यात आली असून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. दरम्यान, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
असे असतील पर्यायी मार्ग?
- नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे पुणे- मुंबईकडे वळवली जातील.
- नगर रस्त्यावरून हडपसर, सासवड आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केसनंदमार्गे थेऊर फाटा येथून इच्छितस्थळी जावे.
- सोलापूर रस्त्याने नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी थेऊर येथून इच्छितस्थळी जावे.
- जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहनांनी भोसरी, चाकण, शिक्रापूरमार्गे जावे.
- वाघोलीकडून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद राहणार आहे.
असा असेल जरांगे पाटील यांचा दौरा
मनोज जरांगे पाटील हे १९ नोव्हेंबरला आळंदीत मुक्कामी आहेत. आळंदीतून सकाळी दर्शन घेऊन तुळापूर येथे येणार आहेत. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे खराडी येथील सभेला उपस्थित राहणार आहेत.