पुणे : आम्ही कधी जातीवाद केला नाही. माझ्या बांधवांनी कधीच कुणाची जात शोधली नाही. प्रत्येकाला आम्ही आधार दिला. माझ्या बापजाद्यांनी अनेकांना दिलं. स्वत: चं लेकरू उघड पडलं पण दुसऱ्याच्या लेकरांना सगळं दिलं. जात ही कधी त्यांनी मानली नाही. माझ्या बापाने लोकांच्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम केलं. लोकांना माझ्या बापाने पोटभरं दिलं. पण आता आपल्या लेकरांसाठी लढण्याची गरज आहे. आता आरक्षण मिळणं गरजेचं आहे, अशी तोफ मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथे झालेल्या सभेमध्ये डागली.
भर उन्हात झालेल्या या सभेसाठी लाखो मराठा बांधव उपस्थित होते. जय शिवराय… म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. इतिहासाचा दाखला देत त्यांनी आरक्षणाची मागणी केली. या वेळी तमाम मराठा बांधवांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण देताना देखील आम्ही कधीच भेदभाव केला नाही. याला जास्त का आणि आम्हाला कमी का, असा सवाल कधीच उपस्थित केला नाही. स्वतःच्या हक्काचे आरक्षण दुसऱ्याला दिले.
सगळ्यांसाठी माझा बांधव उभा राहिला. आम्ही सर्व समाजाला सढळ हस्ते मदत केली. आरक्षण देताना कधीच मागेपुढे पाहिले नाही आणि आजही दुसऱ्यांना मदत करताना मागे सरकत नाही. कुणावर संकट आले तर छातीचा कोट करून आम्ही थांबलो. कधीच कुणाला कमी लेखले नाही. जातीवाद न करण्याचा संस्कार दिला. त्याच पावलावर पाऊल ठेवत आपण पुढे जात आहोत. आमच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करत आहोत.
माझ्या मराठा बांधवांनी ७५ वर्षांत या राज्यात जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या नेत्यांना मोठे करण्याचे काम केले. कधी जात बघितली नाही. खेद वाटतो, ज्यांना मोठं केलं ते देखील आज लेकरांची मदत करायला तयार नाहीत. तुम्हीच सांगा, आमची काय चूक झाली? ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच आपला घात केला, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर घणाघात केला.