पुणे : आजही तळागाळातील मराठा समाज मागास आहे. मराठा तरुणांना उच्च शिक्षण तसेच नोकरीसाठी आरक्षणाची गरज आहे. यासाठीच आमचा संघर्ष सुरू आहे. मला मराठा तरुणांच्या वेदना कळत आहेत. कुणबी दाखला असणाऱ्या मराठ्यांसोबतच त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मुंबईला गेला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हे आंदोलन मी सुरू केले, असे प्रतिपादन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला कोणताही राजकीय वारसा नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझे शिक्षण बारावी झाले आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यासाठी वाट्टेल ते करण्याची आमची जिद्द आहे. हा लढा आम्ही गोदा पट्ट्यातून सुरू केला.
अंतरवाली सराटीतील आंदोलनाबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, हे शांततेत आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी आमच्यावर अचानक हल्ला झाला. आदल्या रात्री पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी येऊन गेले होते. त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही गर्दी कमी केली होती. त्यानंतर हजारो पोलीस आंदोलनस्थळी आले होते. त्यातील काही पोलिसांनी लोकांमध्ये जाऊन धक्काबुक्की केली. त्यानंतर माईकची वायर कट केली. नंतर एकाएकी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. एवढे निर्दयी सरकार आम्ही कधीच पाहिले नाही.
या वेळी जरांगे पाटील यांनी भुजबळांना आव्हान केले. भुजबळ आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत. आमच्या नोंदी सापडल्या तरी म्हणतात मागच्या दारातून आलो. आता सापडलेल्या नोंदी चॅलेंज होऊ शकत नाहीत. भुजबळांनी धनगर आरक्षणाबद्दल भूमिका अजून स्पष्ट केली नाही, असा टोलाही जरांगे पाटलांनी लगावला. कुणाचे वाटोळे करून आम्हाला मोठे व्हायचे नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.