पुणे : मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलनाचा पुण्यातील नियोजित मार्ग बदलण्यात आला आहे. जरांगे यांची मराठा आरक्षण यात्रा पुण्यात पोहचल्यावर आंदोलकांची संख्या देखील प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून पदयात्रेचा मार्ग बदलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार नियोजित मार्ग बदलण्यात आला आहे.
यापूर्वी मनोज जरंगे पाटील यांचा मोर्चा पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, पुणे रेल्वे स्टेशन, पुणे आरटीओ ऑफिस येथून जाणार होता. मात्र, या रस्त्यावर मोठे हॉस्पिटल्स आहेत, रुग्णांना अडचण होऊ शकते या कारणास्तव काही प्रमाणात या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आंदोलनाचा नवीन मार्ग…
पुणे पोलिसांकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहेत की, “मराठा आरक्षण रॅली ही नगर रोडने गुंजन चौक, पर्णकुटी चौक, तारकेश्वर चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी मार्गे पुढे संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, सुर्यमुखी दत्तमंदिर चौक, विद्यापीठ चौक, औंध रोडने सरळ राजीव गांधी पुल मार्गे मार्गक्रमण करणार आहे. वाहनचालकांनी वर नमुद मार्गाचा वापर न करता इतर पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत , असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.