पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात खोतीदारांच्या अटी शर्ती मान्य करत खोतीदार व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. खोतीदारांच्या मागण्या मान्य झाल्याने बाळासाहेब भिसे यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. तसेच रयत शेतकरी संघटनेने आत्मदहन आंदोलन स्थगित करत विजयी जल्लोष केला.
मांजरी उपबाजारात ठेकेदार व्यापाऱ्यांना मज्जाव केल्याने गेल्या आठ दिवसांपासून बाळासाहेब देसाई यांनी आमरण उपोषण सुरू केले होत. तर रयत शेतकरी संघटनेने आत्मदहन आंदोलन कारण्याचे ठरवले होते. संचालक मंडळांनी निर्णय घेतला असून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती सचिव राजाराम धोंडकर यांनी केली. खोतीदार व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर, विभाग प्रमुख किरण घुले, रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष रवीप्रकाश देशमुख, सरचिटणीस अंकुश हंबीर, उपाध्यक्ष रामदास कोतवाल, उपाध्यक्ष हेमंत चौधरी, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजय सावंत, पश्चिम महाराष्ट्राचे कायदे सल्लागार बबनराव गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष महाडिक, सरचिटणीस तानाजी महाडिक, पुणे जिल्हा अध्यक्ष कल्पनाताई गव्हाणे, कार्याध्यक्ष अश्विनी कुंजीर, सरचिटणीस माधुरी वडघुले, हवेली संपर्कप्रमुख प्रियांका आतकिरे, हर्षवर्धन देशमुख , माजी नगरसेवक मारुती आबा तुपे काँग्रेसचे ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे जीवन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, माजी सरपंच सचिन तुपे, उपसरपंच गोकुळ ताम्हाणे, पुरुषोत्तम कुंजीर यांच्यासह सर्व खोतीदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या आठ दिवसांपासून भिसे यांचे उपोषण आंदोलन सुरू होते. संचालक मंडळाने काही अटी टाकून खोतीदारांना परवानगी दिली होती. मात्र, अटी जाचक असल्याने खोतीदारांनी त्यास विरोध केला. त्यानंतर चर्चेतून खोतीदारांच्या अटी मान्य केल्या व त्यांना मांजरी उप बाजारात परवानगी दिली याचे पत्र सचिव राजाराम धोंडकर यांनी दिल्यानंतर ज्यूस पिऊन बाळासाहेब भिसे यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी बाळासाहेब भिसे यांनी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी संघटना व पाठिंबा दिलेल्या सामाजिक संस्थांचे आभार मानले. एकीकडे बाजार समितीचे सचिव आंदोलकांशी वाटाघाटी करत असताना संचालक सुदर्शन चौधरी इतर शेतकरी व्यापाऱ्यांना घेऊन मार्केटमध्ये घोषणा देत वातावरण दूषित करत होते. खोतीदारांना प्रवेश देताना त्यांना मार्केटमध्ये सुविधा व संरक्षण देण्याचे काम केले जाईल, असे सचिव धोंडकर यांनी सांगितले.
आंदोलनास मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा….
गेले आठ दिवस आमरण उपोषण सुरू केलेल्या बाळासाहेब भिसे यांना मनोज जरांगे पाटील यांनी देखील दूरध्वनीवरून पाठिंबा दिला. तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते आजी-माजी आमदार, पदाधिकारी व सामाजिक संस्थांनी भेटून पाठिंबा दिला होता. आंदोलनाची व्याप्ती लक्षात घेता संचालक मंडळाने निर्णय घेऊन खोतीदारांना परवानगी दिली, त्यामुळे अहिंसेच्या मार्गाने भिसे यांनी केलेल्या आंदोलनाचा विजय झाला.