पिंपरी: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या गर्भवती मातेला न्याय मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आईचे छत्र हरपलेल्या दोन्ही बालकांच्या पुढील आयुष्याची काळजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने घ्यावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे.
तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार गोरखे यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला. त्यांच्या लढ्याला अखेर यश आले असून याप्रकरणी संबंधित डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यानंतर आमदार गोरखे म्हणाले की, डॉ. घैसास यांच्यावर बी.एन.एस कलम १०६ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमची पहिल्यापासून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई व्हावी हीच मागणी होती. या कारवाईनंतर कुठल्याही गरीब गर्भवती महिलेला उपचारावाचून, पैशांअभावी थांबवणार नाही, याची काळजी आता रुग्णालये आणि प्रशासन घेतील.
आमचा हा लढा कुणालाही दुखावण्यासाठी नव्हता. गोरगरीबांवर योग्य उपचार व्हावा आणि निष्काळजीपणा होऊ नये, यासाठी होता. याप्रकरणी जुजबी कलम लावलेले नाही. अभ्यास करून कलम लावलेले आहे. अखेर याप्रकरणात भिसे कुटुंबाला न्याय मिळाला. आहे. यानंतर आईचे छत्र हरपलेल्या दोन्ही बालकांची पुढील आयुष्याची काळजी मंगेशकर रुग्णालयाने घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे गोरखे यांनी म्हटले आहे. तसेच, झालेल्या कारवाईसाठी गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत.