पुणे : पीएमपी बसमधील गर्दीचा तसेच वृद्ध महिलांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने लुटण्याचे प्रकार सातत्याने घडतात. मात्र, चाणाक्ष महिलांच्या नजरेतून चोर सुटत नाही. अशीच घटना गर्दीच्या हडपसर गाडीतळ बस डेपो येथे घडली. एका ६७ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानाने दागिने चोरणार्या महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले.
याबाबत आशाबाई डोंगर सनेर (वय ६७, रा. शिरपूर, सध्या देवाची उरळी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुपर्ता अशोक भोसले (वय २२, रा. मनमाड) हिला अटक केली आहे. ही घटना गाडीतळ बस डेपोत सोमवारी दुपारी १२ वाजता घडली.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशाबाई सनेर या उरळी देवाची येथे मुलगी लीना पाटील यांच्या घरी रहायला आल्या आहेत. त्या लीना पाटील यांच्यासह हडपसर ते उरळी देवाची या बसमध्ये चढत होत्या. या बसथांब्ावर सतत गर्दी असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत, लूटण्याचे प्रकार घडतात. आरोपी महिलेने गर्दीमध्ये फिर्यादी ज्येष्ठ महिलेला खाली ओढले. त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले.
मात्र, दक्ष असलेल्या या ज्येष्ठ महिलेच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही. प्रसंगावधान राखत त्यांनी आरडाओरडा केली. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी या महिलेला पकडले आणि बस डेपोमध्ये असलेल्या पोलिसांच्या हवाली केले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुलाणी करीत आहेत.