शिरूर: पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिरूरमध्ये तिरंगी लढत होणार आहे. बांदल यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आढळराव पाटील हे उभे ठाकणार आहेत. बांदल यांनी घेतलेल्या एंट्रीमुळे शिरूर लोकसभेची निवडणूक अतिशय रंगतदार होईल, अशी चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीही मंगलदास बांदल यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत आढळराव पाटील यांना घरी बसविणारच अशी शपथ घेतली होती. परंतु, निवडणुकीपूर्वी अचानक त्यांनी माघार घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारास पाठींबा दर्शवत उमेदवार निवडून आणण्याची शपथ घेत उमेदवार निवडून देखील आणला. आता मात्र मंगलदास बांदल हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक मी लढणार आणि जिंकणार असं बांदल यांनी सांगितले. तसेच सध्या राज्यातील सर्व समीकरणे बदलली असून त्याचा फायदा मला नक्की होईल, असंही त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील सध्याची राजकीय स्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडायचे जाणीवपूर्वक टाळत असल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बांदल यांनी जाहीर केले. कोणी कितीही अडविण्याचा प्रयत्न केला, तरी मी राजकारणातून बाजूला जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त करतानाच आगामी निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिरवाजिरवीच्या राजकारणातून माझ्याविरूद्धचे दहा-पंधरा वर्षांपूर्वीचे आर्थिक गुन्हे उकरून काढले गेले. मला झालेली जेलवारी राजकीय हेतूने प्रेरीतच होती, असा आरोप बांदल यांनी यावेळी केला.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात वारंवार त्यांच्या नावांच्या चर्चा केल्या जातात. पैलवान म्हणूनही बांदल यांची ओळख आहे. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने शिरूर लोकसभेची जागा चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. आगामी काळात जसा प्रचार जोर धरू लागेल, तसे शिरूरचे राजकीय वातावरण तापणार आहे.