पिंपरी चिंचवड : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चौघडा वादनाने ज्यांनी रसिकांची वाहवा मिळवली व रसिकांना मंत्रमुग्ध केले ते पिंपरी-चिंचवड शहरातील चौघडा वादनातील अवलिया रमेश पाचंगे यांची अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात चौघडा वादनासाठी निवड झाली आहे.
सनई चौघडा’ हे मंगलकार्याचे प्रतीक. आजच्या डिजिटल युगात या वाद्याचा निनाद मोबाईल किंवा सीडीमध्ये जरी बंदिस्त झाला असला तरी आजही सनई चौघडा, ताशा, संबळ यासारख्या मंगल वाद्यांचा सांस्कृतिक ठेवा जपलाय तो पाचंगे कुटुंबाने. गेल्या पाच पिढ्यांपासून पाचंगे कुटुंबीय ही कला जोपासत आहेत. यामुळेच अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात चौघडा वादनासाठी पाचंगे यांची निवड झाली आहे.
देशभरातील बांधवाना अयोद्धेतील राम मंदिर सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं स्वप्न अखेर कित्येक वर्षांनी पूर्ण होत आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक महत्वाचे मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. या सोहळ्यासाठी रमेश पाचंगे यांची निवड करण्यात आल्यामुळे पिंपरी-चिंचवडवासियांनी आनंद व्यक्त केला आहे. रमेश पाचंगे हे गेल्या ४० वर्षांपासून चौघडा वादन करत आहेत.
याविषयी बोलताना रमेश पाचंगे म्हणाले, मला खूप आनंद झाला आहे. राम मंदिरात चौघड्याचे नाद घुमणार आहेत. अयोध्येच्या राम मंदिराचे खजिनदार गिरी महाराज यांनी माझी निवड केली आहे. त्यांनी माझा चौघडा ऐकला होता. तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला अयोध्येत घेऊन जाणार. त्यांनी माझा सत्कारही केला होता. खास चौघडा वाजवण्यासाठी आमंत्रित केल्याने मी आनंदी आहे.