गणेश सुळ / केडगाव : वाघ्या मुरळीचा संबळावरचा निनाद.. अन् येळकोट..येळकोट जय मल्हार चा गजर करत देलवडी (ता. दौंड) येथील प्रती जेजुरीच्या खंडेरायाला चंपाषष्ठी उत्सवानिमित्त भावीकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सावाला हजारो भाविकांनी दर्शन घेऊन भंडाऱ्याची उधळण करत वेवेगळ्या कार्यक्रमांनी रंगत चढवली होती.
दौंड तालुक्यातील देलवडी येथे प्रती जेजूरीच्या खंडेराया मंदीरात वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी मार्गशीर्ष प्रतिपदेला गावकऱ्यांच्या हस्ते घटस्थापना होऊन प्रारंभ झाला होता. या उत्सव काळात वाघ्या मुरुळी, लोक कलावंतांचा जागर, मल्हारी सहस्रनाम याग, होम हवन, देवदिवाळी, देवाला तेलवण करून हळद लावण्यात आले. शनिवारी पहाटे चंपाषष्ठी उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त देवाचे घट उठविण्यात आले.
मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने देवाला दुग्धाभिषेक महापूजा घालण्यात आली. या उत्सवाच्या निमित्ताने गेली तीन दिवस हजारोच्या संख्येने भाविकांनी श्रीखंडोबा देवाचे दर्शन घेऊन कुलधर्म-कुलाचार केले. चंपाषष्ठी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी हजारो भाविकांनी श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी प्रती जेजुरी मानल्या जाणाऱ्या देलवडी येथील गडावर गर्दी केली होती.
त्यांना आकर्षित अशी फुलाची सजावट करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल 90 हजार रुपयेची जरबेरा, गुलाब, ऑस्टर, शेवंती, पिवळा व केसरी झेंडू, अशी विविध फुले वापरून कारागीर मचिंद्र अडागळे यांनी निरपेक्ष भावनेने यासाठी कष्ट घेतले होते. देलवडी व एकेरीवाडी (ता. दौंड) येथील प्रतिजेजुरी खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्त शनिवारपासून (ता. 7) सुरुवात झाली होती.
शनिवारी पहाटे खंडोबा देवाचा अभिषेक, त्यानंतर मानाचे दंडवट, तर दुपारी एक वाजता एकेरीवाडी ग्रामस्थांचा मानाचा पोशाख नंतर देलवडी ग्रामस्थांचा मानाचा पोशाख देवाला परिधान केला गेला. शनिवारी रात्री देवाचा छबिना, त्यानंतर शोभेच्या दारुची आतषबाजी झाली. त्यानतंर नांदवळकर लोकनाट्य तमाशा कार्यक्रम झाला. रवीवारी (ता. 8) सकाळी तमाशा हजेरी, दुपारी ३ वाजता देलवडी येथे चितपट कुस्त्यांचा आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री चावडीवर बलुतेदारांना मानाचा विडा वाटप करण्यात आले. त्यानतंर रघुवीर खेडकर तमाशाने यात्रेची सांगता करण्यात आली.