शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मंदार रमेश कळमकर या युवकाने अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास केला. वडिलांच्या निधनानंतर पहिल्याच आठवड्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत नशीब आजमावले. मात्र,त्यामध्ये अपयश आले. परंतु, अपयशाने खचून न जाता मंदार याने दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून आपल्यासह वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
मंदार हा सर्वसामान्य तसेच आजी, आजोबा, चुलते, आई वडील या एकत्र कुटुंबात वाढलेला युवक असून मंदारच्या वडिलांचा वेल्डिंग व्यवसाय, तर आई शेती करायची. दरम्यान, मंदारने पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन येथे घेतले. नंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर पदवीचे शिक्षण कस्तुरी विद्यालयातून घेतले आहे. मंदार पोलीस उपनिरीक्षक झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी मंदारचे पेढे भरवून कौतुक केले, तर मित्रांनी गुलाल उधळत जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते, असे मंदार यांनी यावेळी सांगितले.