पुणे: प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाच्या घराच्या शिफ्टिंगसाठी बोलवलेल्या कामगाराचे साहित्य ने आण करताना तिजोरीतील सोन्याचे ‘बिस्कीट’ पाहून डोळेच गरगरले. त्याने नजर चुकवून तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांच्या वीस बिस्किटांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी कामगाराला बेड्या ठोकून चोरीची बिस्किटे जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी गौतम सोळंकी (वय ५२. रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी नेताजी अरुण उजाधव (वय ३३, रा. निगडी) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
गौतम सोळंकी सराफी व्यावसायिक आहेत. त्यांची मध्यभागात सराफी पेढी आहे. शुक्रवारी पेठेतून नवीन फलॅटवर त्यांच्या घराचे शिफ्टिंग सुरू होते. साहित्य ने आण करण्यासाठी नेताजी जाधव याला कामासाठी बोलवले होते. तिजोरीत त्यांच्या लहान भावाने सोन्याचे बिस्कीट ठेवले होते. साहित्याची ने-आण करताना तिजोरीमध्ये बिस्कीट असल्याचे नेताजी याला दिसले. त्याने १ कोटी ६० लाख रुपयांच्या सोन्याचे बिस्कीट चोरून पोबारा केला.
काही काळानंतर हा प्रकार लक्षात आला. परंतु, नातेवाईकांना आपणच कार्यक्रमासाठी बोलावले आणि आपणच तक्रार केल्यास पोलीस सर्वांची चौकशी करतील, यामुळे त्यांनी तक्रार दिली नव्हती. त्याचवेळी चोरीचे बिस्कीट विकण्यासाठी नेताजी जाधव हा प्रयत्न करत होता. तो काही सराफी दुकानात गेला होता, तेव्हा सराफी व्यवसायिकांनी सोळंकी यांना याची माहिती दिली, नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी जाधव याला बेड्या ठोकल्या.