शिक्रापूर : सध्या अनेक ठिकाणी नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होऊन नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार घडत असताना बँकेतून एका युवकाला जादा आलेले पैसे युवकाने बँकेला परत केले. दिपक पवार या युवकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. शिक्रापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत कोंढापुरी येथील दीपक पवार चेकचे पैसे काढण्यासाठी आले होते, दरम्यान ऐंशी हजार रुपयांचा चेक बँकेत दिल्यानंतर त्यांना नोटा मोजण्याच्या मशीनमधून मोजून रक्कम देऊ केली.
घरी गेल्यानंतर १० हजार रुपये जादा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी पवार यांनी बँक व्यवस्थापकांना याबाबत माहिती देत बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक अर्जुन निलवर्णा, रोखपाल महादेवाप्पा महागावकर यांच्याकडे जादा आलेले दहा हजार रुपये परत केले.