नसरापूर: जादूटोण्याच्या संशयातून एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना भोर तालुक्यातील हातचे खुर्द गावात घडली. खून केल्यानंतर मृतदेह गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपात्रात फेकून देण्यात आला होता. आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अपघाताचा बनाव रचाल्याचे तपासात उपडकीस आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.
स्वप्नील ज्ञानोबा खुटवड (वय ३०. रा. हातवे खुर्द, रा. भोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणपत गेनबा खुटवड (वय ५२, रा. हातवे खुर्द, ता. भोर) असे खून झालेल्याचे नाव आहे. गणपत यांच्या डोक्यात रविवारी (२२ सप्टेंबर) दगड घालून खून केल्याची कबुली आरोपी स्वप्नीलने दिली आहे. गणपत ते गावात देवऋषी म्हणून ओळखले जात होते. ते किराणा माल विक्रीचे दुकान चालवायचे, स्वप्नील आणि गणपत नातेवाईक आहेत. गणपत हे जादूटोणा करत असून त्यांच्यामुळे प्रगती होत नसल्याचा संशय आरोपी स्वप्नीलला होता. जादूटोण्याच्या संशयावरून त्याने गणपत यांचा खून केल्याचे तपासात उपडकीस आले आहे. ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिळीमकर, राजेंद्र गवळी, सहायक निरीक्षक दत्ताजी मोहिते, कुलदीप संकपाळ, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजू मोमीन, अतुल डेरे, बाळासाहेब खडके यांनी ही कारवाई केली.
अन् खुनाचा उलगडा झाला
हातवे बुद्रुक गावाजवळ गुंजवणी नदीच्या पुलाजवळ नदीपात्रात गणपत यांचा मृतदेह आढळून आला होता, त्यांची दुचाकी पुलाच्या कठडयाला अडकवून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गणपत यांच्या डोक्याला झालेली जखम पोलिसांनी पाहिली, तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. सुरुवातीला राजगड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर हे समांतर तपास करीत होते. हातवे बुद्धक गावात पोलिसांनी चौकशी केली. आरोपी स्वप्नीलचा गणपत यांच्याशी काही दिवसापूर्वी वाद झाला होता. यातून त्याने खून केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याला ताब्यात घेतले, चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.