पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाचा तपास करत असताना पोलिसांना त्याच्या खिशात एक मोबाईल फोन सापडला . या मोबाईल फोनच्या माध्यमातून आरोपीला काही तासांतच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नसीम खान असे खून झालेला 37 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.
एकाच रूम मध्ये राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये वारंवार काम सांगण्याच्या वादातून तसेच मारहाण केल्याप्रकरणी रूममेटने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. कमल रोहित ध्रुव असे 19 वर्षीय आरोपीचे नाव आहे. कमल आणि नसीम हे एकत्र राहत असताना नसीम हा कमल याला घरातील सर्व कामे सांगायचा तसेच स्वयंपाकही करायला लावायचा. भांडी घासायला लावून रूम साफ करायला सांगायचा आणि यामध्ये जर काही चुकले तर नसीम कमलला मारहाण देखील करत असे. या सर्व गोष्टींना कंटाळून कमलने नसीमचा खून केला.
हे दोघेही कोंढवा परिसरात टाइल्स फिटिंगचे काम करायचे. ज्या ठिकाणी त्यांचे काम होते, त्याच परिसरात ते राहायचे देखील. वयाने मोठा असल्याने नसीम कमलला सारखा त्रास द्यायचा. इतकच नाही तर दारू पिऊन मारहाण देखील करायचा. सोमवारी रात्री नसीम याने ध्रुवला दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण केली व तो घरातून बाहेर निघून गेला. त्यानंतर ध्रुव देखील त्याच्या पाठोपाठ गेला आणि गळा आवळून त्याने नसीमची हत्या केली. त्यानंतर कमल पुन्हा घरी येऊन झोपून गेला. मात्र काही तासातच पोलिसांनी या गुन्हाचा तपास करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.