चाकण : पीक कर्जाचे वाटप लवकर केले नाही म्हणून शिवीगाळ व दमदाटी करत एकास लोखंडी फायटरने डोळ्यावर ठोसा मारून गंभीर जखमी केले. चाकण जवळील काळुस (ता. खेड) येथे सोमवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब राघू साळुंखे (वय ५७ रा. काळुस संगमवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बाळासाहेब यांच्या फिर्यादीवरून धोंडीबा कुंडलिक पवळे (रा. काळूस ) व त्यांचे आणखी दोन साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी बाळासाहेब साळुंखे हे सोमवारी (दि. ३) त्यांचा नातू मयूर हा चिरंजीव हॉस्पिटल येथे अॅडमिट असताना बाळासाहेब व त्यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळी धोंडीबा पवळे यांनी बाळासाहेब यांना फोन करून पीक कर्जाचे वाटप लवकर केले नाही म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर संध्याकाळी काळुस गावात ग्रामपंचायत समोरही दमदाटी केली. बाळासाहेब यांनी यावेळी धोंडीबा यांना विचारले की माझ्या मुलाला विनाकारण त्रास का देता? त्यावरून त्यांच्यात वाद झाला.
त्यानंतर बाळासाहेब हे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलवरून घरी जात असताना त्यांचा पाठलाग करत धोंडीबा व आणखी दोन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात गाठले. तुला खूप माज आला आहे का? असे म्हणून लोखंडी फायटरने फिर्यादी बाळासाहेब साळुंखे यांच्या डाव्या डोळ्यावर ठोसा मारून गंभीर जखमी केले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बोरकर अधिक तपास करत आहेत.