पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात अनेक भागात कोयता गॅंगने मोठा धुमाकूळ घातला आहे. आता अशीच एक घटना हडपसरमधून समोर आली आहे. कोयता गॅंगच्या टोळक्याने एकास जीवे मारण्याच्या प्रयत्न करत लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केले आहेत. या घटनेत मानेवर वार लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी १२ जून रोजी साडेसात वाजताच्या सुमारास साडेसतरा नळी चौक हडपसर येथे घडली . या कोयता गँगमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शहरातील अल्पवयीन मुलांच्या हातात कोयता दिसून येत असल्यामुळे हा एक चिंतेचा विषय बनला आहे.
याप्रकरणी, राजेशकुमार सत्यनारायण सिंग (वय.३५, रा. प्लॉट क्रं १२७, मांजराई व्हिलेज सोसायटी मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमोल जगन्नाथ गाडेकर (वय. २९, रा. सर्व्हे नं. २०३ साडेसतरानळी तोडमल वस्ती) असे आरोपीचे नाव आहे. तसेच यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविराज पान शॉप अँड जनरल स्टोअर्स नावाची पानटपरी हडपसरमधील साडेसतरानळी चौकात आहे. बुधवारी वरील आरोपी फिर्यादी यांच्या पानटपरीवर आले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी सिंग यांच्याकडे स्टींग कोल्ड्रींगच्या चाळीस बॉटल्स् मागितल्या. त्यांच्या या मागणीला सिंग यांनी नकार दिला. याचा राग आल्याने या टोळक्यातीन दोन अल्पवयीन मुलांनी सिंग यांच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केला. डोक्यावर केलेला हा वार सिंग यांनी चुकवला, मात्र तो वार त्यांच्या मानेवर झाल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादी सिंग यांच्या भावाच्या दुकानाची देखील तोडफोड केली. कोयत्याने चहा बनविण्याची मशीन आणि इतर सामान फोडून मोठे आर्थिक नुकसान केले. दरम्यान, यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यावेळी आरोपीने त्यांच्या हातातील कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली आणि इतर दुकानांचेसुद्धा नुकसान केले. त्यानंतर आरोपींनी तेथे असलेल्या नागरिकांना शिवीगाळ करत पळ काढला. याप्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.