पुणे : शहरात गेल्या महिनाभरात घडलेल्या चार गोळीबाराच्या घटनांपाठोपाठ गंज पेठेत एकाने तरुणीवर पिस्तुलातून गोळीबार केला. वैयक्तीक संबंधातील वादातून घडलेल्या घटनेत ही युवती किरकोळ जखमी झाली. यासंदर्भात एका युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीने संबंध तोडल्याने प्रियकराने तिच्या बहिणीवर गोळीबार केल्याचा हा प्रकार शनिवारी (दि. १८ मे) मध्यरात्री गंजपेठेत घडला. यासंदर्भात ऋषी अप्पा बागुल (वय १८, रा. घोरपडे पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणी एका महाविद्यालयात शिकते. त्यांचा पत्रावळ्या आणि द्रोण तयार करण्याचा व्यवसाय आहे. तिची मोठी बहीण घटस्फोटित असून, आरोपी बागुल याचे तिच्याशी प्रेमसंबंध आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर, तिने बागुल याच्याशी बोलणे बंद केले. त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता. बागुल शनिवारी मध्यरात्री मित्रासोबत प्रेयसीला भेटण्यासाठी गंज पेठेत गेला होता. ती घरात नसल्याचे तिच्या बहिणीने सांगितले. त्यावेळी त्याने जोरदार शिवीगाळ करून तिच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. त्याची ठिणगी डोळ्याजवळ उडाल्याने तिची मावस बहीण जखमी झाली. यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.